कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडमधून पुण्याला जाण्यासाठी आता कमी वेळात व न थांबता प्रवास होणार आहे. पुणे- कराड जाताना अनेक बस या अतित, सातारा, शिरवळ याठिकाणी तसेच नाष्ट्यासाठी थांबत असतात. मात्र आता सोमवार दि. 20 पासून विनाथांबा कराड- पुणे बस सुरू होत आहे. या बसमुळे जलद प्रवास करण्यास मिळणार असल्याने प्रवाशांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
कराडमधील प्रवाशांना पुणे येथे जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली, कोकणासह कर्नाटकातून आलेल्या एसटी बसने जावे लागते. त्या एसटी बस नाष्टा, जेवणासाठी सातारा- पुणे दरम्यान थांबतात. त्यामुळे कराडमध्ये बसलेल्या प्रवाशांची नाहक वेळ वाया जातो. नेमकी हीच बाब विचारात घेऊन कराडवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचावा, यासाठी कराड- पुणे ही विनाथांबा बससेवा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटीच्या सेवेची कोरोनामुळे घडी विस्कटली आहे. लॉकडाउन शिथिल होईल, तशी ही विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी एसटीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत आता नवीन एसटीच्या सेवा सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत कराड आगार प्रमुख विजयराव मोरे यांनी ज्या मार्गावरून उत्पन्न मिळणार आहे, त्यावर तातडीने फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर अन्य फेन्याही सुरू करण्यासाठीही उपलब्ध मनुष्यबळ, एसटी बसची संख्या यांचा विचार करून प्रयत्न सुरू आहेत.