कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
मलकापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रस्तावास मान्यता मिळाल्याने नवीन वर्षामध्ये या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार असल्याने त्यांना नवीन वर्षाची भेट मिळाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शासनाने आकृतीबंध मंजूर करताना राज्यस्तरीय संवर्धन कर्मचाऱ्यांच्या समावेश केल्यामुळे ज्येष्ठ श्रेणीतील पदे मंजूर करण्यात आली होती. तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश 5 एप्रिल 2018 रोजी झाला असल्यामुळे तसेच शासनाच्या धोरणानुसार कर्मचारी ज्या पदावर सलग बारा वर्षे सेवा केली आहे त्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देणे बंधनकारक आहे. मलकापूर पालिकेतील जी पदे आकृतीबंध मध्ये मंजूर आहेत अशा कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी असल्याने कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
पालिकेकडील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित पालिकेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी 2 जानेवारी 2023 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे वर्ग तीन अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेच्या लाभ देण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.