नवी दिल्ली । मोबाईल युझर्ससाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे आता लवकरच ते 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करू शकतील. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये संपूर्ण महिन्याच्या टॅरिफ प्लॅनसह अनेक मोठे निर्णय आहेत. Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 अंतर्गत, TRAI ने असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्याबद्दल युझर्सना खूप आनंद होईल.
TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना असा किमान एक टॅरिफ प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले आहेत, ज्याची व्हॅलिडिटी 30 दिवस असेल.
गुरुवारी एका आदेशात TRAI ने सांगितले की,”सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर करावे.” TRAI ने सांगितले की,” कंपन्यांनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केले पाहिजे जे दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू केले जाऊ शकतील.”
Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 जारी केल्यानंतर, मोबाईल फोन युझर्सना अनेक रिचार्ज प्लॅन ऑप्शन मिळतील. युझर्सना या प्लॅनमध्ये पूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा पर्याय देखील मिळेल.
आतापर्यंत टेलिकॉम कंपन्या 28 आणि 24 दिवसांचे रिचार्ज प्लॅन देतात. टेलिकॉम कंपन्या महिनाभर पूर्ण रिचार्ज देत नाहीत, अशी युझर्सची तक्रार होती. त्यामुळे युझर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, त्यासाठी जास्त पैसे खर्च होतात. TRAI ने सांगितले की, युझर्सकडून त्यांना मंथली प्लॅनसाठी वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावे लागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे वाटते.
TRAI च्या म्हणण्यानुसार, नवीन बदलांचा युझर्सना खूप फायदा होईल आणि त्यांना त्यांच्या सोयीनुसार योग्य व्हॅलिडिटीसह प्लॅनचे आणखी पर्याय देखील मिळतील.
टेलिकॉम कंपन्यांचा निषेध
TRAI च्या या आदेशाला टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला आहे. टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे की, 28 दिवस, 54 दिवस किंवा 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणताही प्लॅन बदलल्यास बिल सायकलमध्ये खूप त्रास होईल. कंपन्यांचे म्हणणे आहे की, पोस्टपेड प्लॅन्ससाठी दरमहा त्याच तारखेसाठी आणि त्याच रकमेसाठी रिचार्ज रिन्यू ऑफर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.