विधयेकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय राज्यसभेत मतदान करणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका ट्विट करत स्पष्ट केली आहे. विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी आता घेतली आहे. शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होत मात्र आता राज्यातील सत्तेत सहभागी असलेले पक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर नाराज झाले असल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच विधेयकाच्या बाजूने आधी शिवसेनेनं मतदान करून आता स्पष्टतेच कारण पुढे करत राज्यसभेत मतदान करणार नसल्याचे सांगितल्याने शिवसेना सध्या काहीशा गोंधळात असलेली दिसत आहेत.

आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणाले कि, “देशामध्ये जे एक वातावरण केलं जात आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणलं जातं, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे.” ते पुढे म्हणाले कि, “लोकसभेमध्ये काल मांडलेल्या बिलाबद्दल स्पष्टता नीट दिसत नाही आहे, काल शिवसेनेनी आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे. अनेक प्रश्न आहेत देशासमोर, ते आम्ही सभागृहात सुद्धा मांडले व सामनाच्या माध्यमातून जाहीरपणे सुद्धा मांडले.” शिवसेनेने लोकसभेत जरी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं असलं तरी राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक असल्याचं सांगत याविधयेकाबाबत अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने लोकसभेत मतदान केल्याने काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. सावंत म्हणाले कि, “राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असंही ते म्हणाले होते.

 

Leave a Comment