सोलापूर प्रतिनिधी । आज सकाळी हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिसांच अभिनंदन केलं आहे. विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या कारवाईचे समर्थन केलं असताना सरकारने त्या पोलिसांच्या पाठीशी उभ राहून पोलिसांना क्लीन चिट दिली पाहिजे. असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ”या पुढे बलात्काऱ्यांचा थर्ड डिग्री टॉर्चर करून एन्काउंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर क्लोज करुन पोलिसांना शाब्बासकी दिली पाहिजे” असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती.
मात्र आता या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या कारवाईमुळं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असताना सामाजिक स्तरातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.