पंढरपूर प्रतिनीधी । पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जुलै २०२० मध्ये होत असून पदवीधर व शिक्षक नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने दिलेली पहिल्या टप्प्यातील मुदत दि. ६ नोव्हेंबर रोजी संपली. यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी ५३,६४१ मतदारांची नोंदणी झाली असून सर्वाधिक यामध्ये पुणे १८७१४, सोलापूर १०९३९, कोल्हापूर १०७१४, सातारा ६९४१ तर सांगली जिल्ह्यात ६३२३ इतकी नाव नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदार संघामध्ये पुणे ५९४१९, सोलापूर ३७७५१, कोल्हापूर ७५८२३, सातारा ५७४७३ तर सांगली जिल्ह्यात ७३७८८ इतकी नोंदणी झाली आहे. परंतु अजूनही अनेक पदवीधर व शिक्षक नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी समता फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी पत्राद्वारे सातारा व सोलापूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांना मुदतवाढीसाठी आवाहन केले होते.
आता निवडणूक आयोगाने पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांना व पदवीधरांना मतदान नोंदणी साठी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांनी व पदवीधरांनी अद्याप नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता नव्याने मतदार नोंदणी बाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत नाव नोंदणी झालेल्या अर्जावर दि. २३ नोव्हेंबर २०१९ ते दि. ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून ३० डिसेंबर २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी चालू राहणार असून त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पात्र मतदारांची नावे पुरवणी यादी करीता मतदार नोदंणीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे माहिती दिली आहे.