पुणे | चैतन्य दासनूर
ग्रामीण भागात अनेक गोष्टींची मुळं रोवलेली असतात. त्यामूळ तिथल्या लोकांना उसनं अवसान घेऊन काम करावं लागत नाही. या ठिकाणीच पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य आहे. त्यामुळं ग्रामीण पत्रकारांसाठीच्या कार्यशाळा या गावातच झाल्या पाहिजेत असं मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं. पुण्याचा दृष्टीकोन हा ग्रामीण भागाबाबत तुच्छतावादी आहे. पत्रकारांनी केवळ शब्दांच्या खेळात न अडकता वस्तुस्थिती समजावून घेऊन त्याच्या खोलात काम करण्याची आवश्यकता आहे. बातमीदारापेक्षा येथील व्यवस्था मोठी आहे. त्यामुळे व्यवस्थेत काम करताना स्वत्व न हरवता काम कसं करता येईल याकडे पत्रकारांनी लक्ष द्यावे असंही कांबळे म्हणाले.
पत्रकार भवन येथे पार पडलेल्या ग्रामीण पत्रकार सन्मान कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी ग्रामीण भागातील आव्हानं व संधी यावर भाष्य केले. सम्यक संवाद व संसाधन केंद्र पुणे, एम्प्लिफाय चेंज, एशिया सेफ एबॉर्शन पार्टनरशीप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्री अभ्यास केंद्र आणि संज्ञापन व व्रुत्तपत्रविभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ स्रिवादी कार्यकर्त्या रझिया पटेल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन उत्तम कांबळे यांच्यासहीत कवयित्री दिशा शेख, संज्ञापन व व्रुत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे व स्री अभ्यास केंद्राच्या प्राध्यापिका स्वाती देहाडराय या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचुन झाली. प्रास्ताविक डॉ. आनंद पवार यांनी मांडले त्यात त्यांनी गर्भपाताची आवश्यकता समजाऊन सांगताना रेडियोलोजीस्टची लॉबी कशाप्रकारे समाजात कार्यरत आहे याचीही माहीती दिली. दिशा शेख हिने कलम ३७७ विषयी बोलताना सांगीतले की ह्या निर्णयाद्वारे समलैंगिकांसाठी केवळ एक दार उघडले गेले आहे, अजुन बरीच कामं बाकी आहेत. पुढे त्या म्हणाल्या की लेखकाने विचार करुन लिहीण्यापेक्षा आपल्या विचारात लिहीले पाहिजे. भोंगळ होऊन लिहील पाहीजे. सांस्कृतिक बदलाचा भाग होताना आपण आपलं मुळपन विसरुन जातोय. हल्ली माझ्या लिखाणावर प्रेम करणारेसुद्धा म्हणतात – ‘दिशा, तू पहिल्यांदा लिहायची तेच जास्त भारी होतं, ते मनाला भिडायचं’. एकूणच काय पुण्यात आल्यावर माझ्याही भाषेचा ऱ्हास होईल का? अशी भीती मला वाटते.
या कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षा रझिया पटेल यांच्या भाषणाने झाला सम्यकचे अभिनंदन करताना त्या म्हणाल्या की स्री पुरुष समानतेसाठी आपणास अजुन बऱ्याच गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. स्रियांसंबंधीच्या अनेक विषयांवर केवळ चर्चा होते मात्र त्यावर कारवाई करताना सर्वत्र उदासिनता दिसते. भाषेविषयी बोलताना त्या म्हणाल्या की आजची प्रचलित भाषा ही पुरुषसत्ताक मानसिकतेतुन जन्माला आली आहे. त्यामुळे आपणांस भाषेवरही काम करण्याची आवश्यकता आहे.
अध्यशीय भाषणाआधी काही ग्रामीण पत्रकारांचा संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रज्ञा मोळावडे यांनी केले.