सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. रंगारी यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे प्रकरण
मृत संजय रंगारी हे शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. ते रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. कुटुंबीयांनी संजय रंगारी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर काल सकाळी रंगारी यांच्या शेतीच्या बाजूला राहणाऱ्या एका शेतकऱ्याला त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने त्वरित मृताच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असता त्यांना मृताच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली.

या सुसाईड नोटमध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतील ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य ग्रामसदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या आरोपींनी आपल्याला पदावरून काढण्याची धमकी दिली होती, असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. पदावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे तणावात असलेल्या रंगारी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हिवकराज रंगारी यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक, सरपंच आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमगाव पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment