केंद्र सरकारकडून प्रवाशांना मोठा दिलासा, देशात उद्यापासून इंटरनॅशनल फ्लाइट्स सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून बंद असलेल्या इंटरनॅशनल फ्लाईट्स सर्व्हिस उद्या म्हणजेच 27 मार्चपासून सुरू होणार आहेत. यापूर्वी, केंद्र सरकारने विमानतळ आणि फ्लाइट्सवरील सध्याच्या कोविड -19 नियमांमध्ये अनेक शिथिलता जाहीर केल्या आहेत.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, केबिन क्रू सदस्यांना यापुढे पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) किट घालण्याची आवश्यकता नाही आणि विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी गरज पडल्यास प्रवाशांची तपासणी पुन्हा सुरू करू शकतात.

सरकारने जाहीर केले आहे की इंटरनॅशनल फ्लाइट्सवर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एअरलाइन्सला 3 जागा रिकाम्या ठेवण्याची आवश्यकता नाही. हवाई वाहतूक आणखी चांगल्या पद्धतीने चालवण्याची सोय लक्षात घेऊन केंद्राने हे नियम शिथिल केले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, उच्च पातळीच्या लसीकरणासह, देशात कोरोनाव्हायरस संसर्गाची संख्या कमी होत आहे.

मात्र, केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की विमानतळावर आणि फ्लाइट्सदरम्यान फेस मास्क घालणे आणि हाताची स्वच्छता / सॅनिटायझर वापरणे अद्याप बंधनकारक आहे. विमान कंपनी सुरक्षिततेची कारणे लक्षात घेऊन काही अतिरिक्त PPE किट, सॅनिटायझर आणि N-95 मास्क घेऊन जाऊ शकते. ते प्रवाशांना तसेच फ्लाइट स्टाफमधील कोणत्याही व्यक्तीच्या संसर्गाशी संबंधित प्रकरणांमध्ये वापरले जाऊ शकतात.

Omicron व्हेरिएन्टमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आलेल्या मंदीतून भारतीय विमान वाहतूक बाजार अजूनही सावरत आहे. खरं तर, जानेवारीमध्ये, कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रवासी बंदी लादण्यात आली ज्यामुळे विमान कंपन्यांची हालचाल पुन्हा ठप्प झाली.

भारताने 23 मार्च 2020 रोजी नियोजित इंटरनॅशनल फ्लाईट्स स्थगित केली. मात्र, जुलै 2020 मध्ये 37 देशांसह एअर बबल व्यवस्थेद्वारे फ्लाईट्स पुन्हा सुरू करण्यात आली. यामध्ये काही अटींसह मर्यादित संख्येने फ्लाईट्सला मान्यता देण्यात आली. यापूर्वी, केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर 2021 पासून देशांतर्गत विमान कंपन्यांना पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली होती.