खऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम केसरी पैलवान जयराज परकाळे यांच्या रांगडेपणाची गोष्ट..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाचुन आश्चर्य वाटलं ना.. पण हो..बारामतीचे पैलवान जयराज परकाऴे यांना खर्या आयुष्यातले राणादा म्हणलं तर वेगळं ठरणार नाही. जसा मालिकेतला राणादा होता. जसे त्याचे फॅन्स होते. तसे खर्या आयुष्यातल्या राणादा उर्फ जयराज परकाळेंचे ही फॅनफॉलोईंग महाराष्ट्रभर आहे. चालता बोलता, आणि शांत राहताना ही देहातुन झळकणारा रुबाब, नजरेत असणारी धार, आवाजात असणारा खर्ज, आणि यातुन सर्वांना आपलेसे वाटणारे जयराज परकाळे कुस्ती व पैलवानांच्यात लोकप्रिय आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी सोशल मिडियात एक फोटो खुप व्हायरल झाला होता. एका बैलासमोर बलाढ्य शरीरयष्टीची एक व्यक्ती त्या बैलाच्या समोर शांतपणे उभी आहे.आणि तो बैल ही कसलीच हालचाल न करता उभा आहे. तो फोटो सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला. वॉट्सअप, फेसबुक वर त्यावर बरच लिहलं गेलं. संदेश पेरले गेले. तो फोटो जयराज यांच्या शेतातला होता. लहानपणापासुन कुस्तीची प्रचंड आवड. वडील कुस्तीगीर असल्यानं जयराज यांच्याकडे कुस्तीचा वारसा ओघाने आला. पण तेव्हा ही जयराज मैदानात उभे रहायचे तेव्हा समोरचा पैलवान मागे सरायचा. मग नंतर कुस्ती न खेळताच पैलवान जयराज परकाळे विजयी व्हायचे. अजस्त्र पिळदार शरीर समोर पाहिल्यावर अनेक पैलवान माघार घ्यायचे. त्यामुळे बर्याचदा जयराज हे कुस्ती न खेळताच जिंकले होते. आवाजातला रांगडेपणा, अन ह्रदयातली माया पाहुन कुणीही म्हणणार नाही की जयराज परकाळे हे कॉन्व्हेंट चे विद्यार्थी असतील. जेवढा आवाजात व बोलीभाषेतला रांगडेपणा. तितकच इंग्रजी ही ते सफाईदार बोलतात.

कौटुंबिक जबाबदाऱ्या –
जयराज यांचे वडील आजारपणामुळे बरीच वर्षे जागेवर बसुन होते. त्यांच्या पत्नी सविता परकाळे यांनी त्यांची खुप काळजी घेतली. त्या दरम्यान जयराज हे लहान होते. त्यामुळे लहान वयातच अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. पण त्यांच्या आईने सगळं काही सांभाळत जयराज यांना मोठं केलं. घरच्या शेतीचा पसारा मोठा असल्यानं नंतर जयराज यांनी सर्व लक्ष शेतीकडे वळवलं. शेतीची ही आवड असल्यानं त्यांनी शेतीबद्दल तळमळ आहे.

या सगळ्यात त्यांनी कुस्तीव्यतिरिक्त बैलप्रेम ही जपलॆ आहे. संपुर्ण महाराष्ट्रभर अनेक असे लोक आहेत ज्यांनी आपले बैलप्रेम जपले आहे. त्यात जयराज ही आहेत. शेतकरी असल्यानं त्यात बैलांची जोपासना ते अधिक करतात. त्यामुळे ही त्यांचे फॅनफॉलोईंग महाराष्ट्रभर आहे.

आजारपणातही बुलेट चालवत दवाखान्यापर्यंत पोहोचले –

एकदा अचानक जयराज यांना ताप व अशक्तपणा येऊ लागला. काही समजेनाच. त्यांची आई व पत्नी ही काळजीत पडल्या. कुणाला तरी बोलवुन तुला दवाखान्यात न्यायला लावते असं आई म्हणाल्या. पण पैलवान जयराज परकाळे यांनी वेळ न दवडता बुलेट ला किक मारली.अन काही मिनिटात दवाखान्यात पोहोचले. रिसेप्शनिस्ट पाशी पोहोचल्यावर तिने विचारले..नंबर लावायचाय का..
हो.. काय होतय..बहुतेक डेंग्यु आहे. अहो पण तुम्हाला बघुन तर वाटत नाही डेंग्यु असेल म्हणुन.. जयराज यांनी त्यावर काहीच न बोलता नंबर आल्यावर ते डॉक्टरकडे पोहोचले. डेंग्युचे निदान झाले. गोळ्या घेतल्या. त्यांच्या डॉक्टर ने सांगितले होतं की महिनाभर कुठेही जाऊ नका. आणि आराम करा. सोबत कोण आलय..जयराज म्हणले एकटाच आलोय..कसे आलात मग? बुलेटवर.. !
डॉक्टर त्यांच्या या उत्तरावर एकटक पाहत बसले आणि त्यांनी सांगितलं. पुढल्या वेळेस गोळ्या संपल्यावर कुणाला तरी सोबत आणा.

काही दिवसांच्या गोळ्या संपल्यानंतर पुन्हा जयराज बुलेटवरुन डॉक्टरकडे…रिसेप्शनिस्ट पुन्हा अवाक..आणि डॉक्टर ही..मी सांगितल होत की तुम्ही एकटे येऊ नका. अन दुचाकीवर तर नकोच. चक्कर आली तर करणार काय..अहो..मला तर काहीच वाटना.. फ्रेश वाटतय.. थोडासा अशक्तपणा जाणवतोय. पण तो ही व्हईल कव्हर..डॉक्टर म्हणाले‌, तुमच्या जागी दुसरा कोण असता तर आत्तापर्यंत त्याला सलाईन लावायला लागलं असतं.

वडिलांचा वारसा –
जयराज यांचे वडील महिन्याच्या प्रत्येक एकादशी ला पंढरपुर ला जात असत. वडीलांच्या निधनानंतर जयराज यांनी त्यांचा वारकरी संप्रदायाचा वारसा अव्याहतपणे जपला आहे. ते जेव्हा भारतभीम केसरी विजेते झाले तेव्हा त्यांनी जिंकलेली गदा विठ्ठलाच्या चरणी ठेवली होती. शंकरआण्णा पुजारी हे कुस्ती क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव. साक्षात आण्णांना ही जयराज यांचे मोठे कौतुक वाटते. शाकाहारी पैलवान, दर पंधरा दिवसाला पंढरपुर ला जाणे, शेतीचा पसारा सांभाळत कुस्ती जपणे, यामुळे अण्णांना जयराज यांचे विशेष कौतुक वाटते. अण्णांचा विषय निघताच खुद्द पै.जयराज ही त्यांचावर भरभरुन बोलतात.अन भावुक ही होतात.

फॅनफॉलोईंग –
बारामतीवरुन कोल्हापुराकडं गाडी निघाली की जाताना त्यांची गाडी आता बर्याचशा पैलवानांच्या ओळखीची झाली आहे. किनी टोलनाक्यावर तर त्यांची गाडी दिसली की कोण जयराज यांना दुध आणुन द्यायचं. कोण भेटायच. पाया पडायचं.. विचारपुस करायचं.. सेल्फि घ्यायचं.. या गराड्यात त्यांचे कुटुंबिय मात्र गाडीत बसुन जयराज त्या गराड्यातुन कधी मोकळे होतील याची वाट पाहत राहतात. बारामतीवरुन कोल्हापुर ला जायला समजा चार साडेचार तास लागत असतील तर जयराज यांना सहा तास लागतात. हात केली गाडी थांबवावी लागते. बोलावं लागतं. विचारपुस करावी लागते. कुणाची काय अडचण असली तर ती सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो असे ते म्हणतात. शेवटी कुस्ती नं आपल्याला ओळख दिलीये. तिच्यासाठी झिजलं पाहिजे असं ते नेहमी म्हणतात. पुणे भागात तर कित्येक बैल व खिलार प्रेमी ग्रुप्स असल्यानं तिथे ही त्यांची चर्चा राहते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे वज्रदेही पैलवान असं नामकरण केले आहे. कित्येकांनी त्यांचे स्केचेस व पेंटिंग्ज तयार करुन त्यांना पोस्टाने पाठवलेत. वॉट्सअप ला पाठवलेत.…

राणादा अन जयराज यांची भेट –
मालिकेतल्या राणादा ला समजलं होतं की जसं आपलं पात्र साकारलय..तसच त्याला मिळतं जुळतं असणारे एक राणादा खर्या आयुष्यात ही आहेत. अगदी शेतातला गडी, साहेबराव.. हे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर सगळं काही मिळतंजुळतं. मालिकेतल्या राणादा ने स्वत: त्यांना भेटायची तयारी दर्शवली. अन दोघांची कोल्हापुरात भेट ही झाली. सुमारे तासभर गप्पा झाल्या. तो राणादा या खर्या राणादा ला पाहुन भारावुन गेला. जेव्हा मालिका आली त्यानंतर सोशल मिडियात अनेक जणांनी पैलवान जयराज परकाळेंना मेसेज केले..कॉल्स आले..की तुम्हाला विचारुन हे पात्र मांडलय का.. त्यावर जयराज म्हणायचे नाही हो.. उलट हे मेसेज अन कॉल्स पाहुन मलाच विशेष वाटतय..मुलाला घेऊन ते एकदा दवाखान्यात गेले असता समोर बसलेल्या एका कुटुंबातील छोटी मुलगी सारखी त्यांच्याकडे पाहत होती. पंधरा वीस मिनिट हे चाललं. शेवटी ती मुलगी तिच्या वडीलांना म्हणाली.. पप्पा.. हे राणादा आहेत ना.. चला ना आपण त्यांच्यासोबत सेल्फि घेऊयात. त्यांनंतर ते वडील म्हणाले..ते राणादा नाहीत पण अगदी तसेच वाटतायत. शेवटी तिच्या वडिलांनीच पुढे येऊन जयराज यांच्यासोबत एक सेल्फि घेतला. तुळजापुरात एकदा ते सहकुटुंब दर्शनासाठी गेले असता मराठीतले अभिनेते विरेंद्र कदम यांनी त्यांना पाहिलं. आणि त्यांना पाहताच ते बोलले..असे ड्रेसिंग मी पहिल्यांदाच पाहिले आहे. आणि त्यांनी त्यानंतर काही वेळ चर्चा करत सोबत नंतर फोटो ही घेतला.

खरा बाहुबली – उधळलेल्या बैलाला एका हाताने धरुन शांत केले..

नेहमीप्रमाणे जयराज यांचा शेतातला दिवस चालु होता. रानातले गडी आपापल्या कामात व्यस्त होते. जयराज नेहमीप्रमाणे बैलाजवळ आले असता अचानक तो बैल उधळला. झालेली गडबड पाहुन गडी पळत आले. तीन ही गड्यांनी बैलाला मागुन दाव्याने मागे खेचले पण बैल ऐकेना. गडी मागं सरले तेवढ्यात पुढे जयराज यांनी वीतभर अंतरावरुन बैलाच्या दोन्ही कानाला धरुन एक पाय पुढं व एक पाय मागे ठेऊन त्या बैलाला ते मागे रेटत होते. पण त्यात बैलाने त्यांना खाली पाडले.. चार पायाच्या त्या ताकदवान जनावराने जयराज यांना खाली पाडताच जयराज त्याच अवस्थेत बैलाचा पाय हातात धरुन जागेवरुन उठले तीन ही गड्यांना बैल ऐकेना. मागुन पाय लागत असल्यानं त्यांना बैलाला धरता ही येईना. जयराज ही स्वत: मागे जागा नसल्याने जागेवरच अडकले.. यात काही क्षण कुणाला काय करावे समजेना. शेवटी जयराज यांनी परिस्थिती ओळखुन आहे तेवढी ताकद लावुन फक्त एका हाताने बैलाला एकट्याने मागे सारत सारत जागेवर आणलं.. खाली पडुन ही पुन्हा शिताफीने बैलाच्या पायाला पकडत त्याला एका हाताने स्वतची ताकद लावुन मागे सारताना तीन ही गडी नंतर भावुक झाले होते.. बाहुबली चित्रपटातल्या त्या सीन ला पाहताना अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण खर्या आयुष्यात ही ह्या बाहुबली ने एक उधळलेला बैल एका हाताने आवरत त्यात मागे रेटत शांत केला होता. हा अनुभव सांगताना त्यांचे तीन ही गडी आज सुधा भावुक होतात.

जिद्द, मेहनत, चिकाटी –
शंकरआण्णा पुजारी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, एक पैलवान असाच घडत नाही. त्यासाठी लागते. जिद्द मेहनत अन चिकाटी.. पैलवान जयराज परकाळे यांनी हे वाक्य तंतोतंत जगलं. लग्न होऊन, दोन छोटी अपत्ये असुन जेव्हा त्यांनी वर्षभर भारतभीम केसरी साठी व्यायामाची तयारी सुरु केली. तेव्हा त्यांची जिद्द व चिकाटी दिसुन आली. आणि ते स्पर्धा ही जिंकले. जयराजला फेटा बांधताना खुद्द शाहु महाराजांना फेटा बांधल्यासारखं वाटतं. असं दस्तुरखुद्द शंकरआण्णा पुजारी म्हणतात.

कमी वयात समोर असणार्या जबाबदार्या, त्यातुन आई च्या मदतीने मार्ग काढत,जयराज यांनी खर्या आयुष्यातलं मैदान सर्वांना सोबत घेत, मायेचा ओलावा जपत, प्रसंगी फणसारखं वरुन काटेरी पण आतुन गोड राहत ते जिंकत आलेत. मैदानात समोरच्या पैलवानाला शड्डु मारुन लढावं लागतं. हार जीत हा खेळाचा भाग. पण जयराज यांनी खर्या आयुष्यात ही अनेक संघर्षाचे प्रसंग पाहिले. तिथेही त्यांचा शड्डु घुमला. आणि घुमत राहील.

कुस्तीमुळे आपण आहोत. याची जाण त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या व्यस्त जीवनातुन ही ते कुस्तीसाठी आवर्जुन वेळ देतात. गाठीभेठी ठेवतात. आणि घराचा, कुस्तीचा वारसा अखंडपणे जपत राहतात.. अनेकांसाठी ते आयडॉल ठरतात. कुणाला हक्काचा आधार होतात. शेतातल्या खतपाण्या इतकच मैत्रीचं खतपाणी ही ते वेळोवेळी जपतात. दरवर्षी संतश्रेष्ठ सोपानकाका महाराजांच्या पालखीला त्यांचे बैल जोडण्याचा मान राहतो…… त्यामुळेच की काय..फक्त कुस्तीशौकिनांनाच नाही तर त्या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रातील लोकांना ही ते आपलेसे वाटतात. अनेकांना परिचित असणारे, फॅन फॉलोईंग असणारे पैलवान जयराज परकाळे उर्फ खर्या आयुष्यातले बाहुबली.. मात्र त्यांचे जीवन कुस्तीशिवाय अपुर्णय..असं आवर्जुन नमुद करतात.

—विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment