Tuesday, January 7, 2025

Great Wall Of India : भारतात ‘या’ ठिकाणी आहे ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’; पहायला पर्यटक करतात गर्दी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Great Wall Of India) आपल्या देशाची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातील अनेक ठिकाणे त्यांच्या संपन्न सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. जी पाहण्यासाठी देशात अनेक विदेशी लोक सतत येत असतात. त्यामुळे भारतात पर्यटनाचा व्यवसाय मोठ्या पातळीवर चालतो. भारताच्या पश्चिम भागातील राजस्थान देखील यांपैकी एक स्थळ आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. राजस्थान आपली संस्कृती, खाद्य पदार्थ, वेशभूषा आणि संगीत वारशासाठी ओळखले जाते.

राजस्थानमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. येथे अनेक राजे महाराजांचे भव्य किल्ले तसेच राजवाडे आहेत. त्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे असे आहे. यांमध्ये कुंभलगड किल्ला अत्यंत प्रसिद्ध आहे. (Great Wall Of India) या किल्ल्याच्या सौंदर्याची ख्याती संपूर्ण जगभरात आहे. या किल्ल्यामागे एक भव्य आणि रंजक इतिहास सांगितला जातो. या किल्ल्याविषयी विशेष बाब सांगायची म्हणजे, या किल्ल्याच्या भिंतीला ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असे म्हणतात. चला तर या किल्ल्याविषयी आणखी काही माहिती घेऊया.

कुंभलगड किल्ला (Great Wall Of India)

राजस्थानचा कुंभलगड किल्ला राजसमंद या ठिकाणी आहे. उदयपूरपासून या किल्ल्याचे अंतर सुमारे ८४ किमी आहे. हा किल्ला त्याच्या भव्य भिंतींसाठी ओळखला जातो. माहितीनुसार, या किल्ल्याची भिंत ३६ किलोमीटर लांब आहे. चीनच्या ग्रेट वॉलनंतर जगातील दुसरी सर्वात लांब भिंत म्हणून ही भिंत ओळखली जाते. म्हणूनच या किल्ल्याच्या भिंतीला ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. १५ व्या शतकात मेवाडचा शासक राणा कुंभ याने हा किल्ला बांधला होता. त्यामुळे या किल्ल्याला कुंभलगड किल्ला असे नाव देण्यात आले.

भव्य कुंभलगडचे ७ प्रवेशद्वार

कुंभलगड या किल्ल्यावर प्रवेशासाठी एकूण ७ दरवाजे आहेत. ज्यांची नावे आरेत पोळ, हनुमान पोळ, राम पोळ, विजय पोळ, निंबू पोळ, पघरा पोळ आणि टॉप खाना पोळ अशी आहेत. या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर वसवलेल्या कुंभलगड किल्ल्यात ३६० पेक्षा जास्त मंदिरे आहेत. यातील लक्ष्मी नारायण मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. (Great Wall Of India)