आता लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावणार, यासाठी सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात बस, ट्रक आणि कार चालवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे. शहरांमधील सांडपाणी आणि घनकचऱ्याचा वापर करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचाही त्यांचा विचार असल्याचे गडकरी म्हणाले.

लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार धावणार असल्याचा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. 1 जानेवारीला ते असे करण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत कार खरेदी केली असून फरिदाबाद येथील तेल संशोधन केंद्रातून ग्रीन हायड्रोजन घेतले आहे. हे शक्य आहे हे लोकांना सांगण्यासाठी मी लवकरच कार घेऊन निघणार असल्याचे त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

गडकरींची योजना काय आहे जाणून घ्या ?
गडकरी म्हणाले, “मी येत्या दोन-तीन दिवसांत एका फाईलवर स्वाक्षरी करणार आहे, ज्यात कार उत्पादकांना 100 टक्के बायो-इथेनॉलवर चालणारे इंजिन्स बनवण्यास सांगणार आहे.” मंत्री पुढे म्हणाले की,”देशात सध्या दरवर्षी 8 लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात केले जातात. जर देशाचा वापर असाच सुरू राहिला तर पुढील 5 वर्षांत आयात बिल 25 लाख रुपयांपर्यंत वाढेल,”असे ते म्हणाले.

ग्रीन हायड्रोजनवर वाहने धावतील
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की,”सरकार ग्रीन हायड्रोजनवर चालणारी सार्वजनिक वाहतूक चालवण्याचा विचार करत आहे.” आम्हाला कार, बस, ट्रक ग्रीन हायड्रोजनवरच चालवायचे आहेत, त्यासाठी नदी-नाल्यांमध्ये पडणारे घाण पाणी वापरावे, त्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार कराचे आहे. ग्रीन हायड्रोजनवर वाहने धावतील तो दिवस आता फार लांब नाही,”असेही गडकरी म्हणाले.