हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्युंच्याघडलेल्या घटनेनंतर राज्य शासन सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच महत्वाची बैठक घेत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात असलेला औषध पुरवठा व आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा घेण्याच्या सूचनांना केल्या. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी डूडी यांच्या सोबत क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देत माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांना खडे बोल सुनावले. तसेच कागदी घोडे नाचवू नका, औषधे कधी संपणार याची माहिती ठेवा, अशा सूचना केल्या.
राज्यातील नांदेडच्या रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शासनावर विरोधकांकडून टीका होत आहे. रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी आणि औषधसाठा शिल्लक रहावा, रुग्णांना बाहेरुन औषधे आणावयास लागू नये यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत काही निर्णय घेतले आहेत. त्यासाठी स्थानिकस्तरावर औषधे खरेदी करता येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयांना भेट देऊन माहिती घेण्याचीही सूचना केली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या भेटी प्रसंगी पालकमंत्री देसाई यांच्याबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सुरुवातीला अतिदक्षता विभागाला भेट दिली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1029471068292912
अतिदक्षता विभागातील बेडची क्षमता, रुग्णांवर वेळीच उपचार होतात का ? अडचणी काय आहेत का याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर औषध साठा ठेवलेल्या स्टोअरला भेट दिली. स्टोअर रुममध्ये जाऊन त्यांनी पाटण, कराड, दहिवडी ग्रामीण रुग्णालयात किती औषधसाठा शिल्लक आहे, असा प्रश्न केला. याबाबतचे रजिस्टर तसेच प्रिंट द्या, अशी सूचनाही केली. खासगी स्टोअर किपरपेक्षा शासकीय रुग्णालयातील किपरला पाच पट जादा पगार आहे. त्यामुळे कामे चांगली करा, असेही सुनावले. तसेच जिल्हा नियोजनमधून औषधासाठी पैसे मिळतात. स्थानिक स्तरावर औषधे खरेदीचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे नियोजन करा, असे सांगितले.
सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये 6 महिने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा : पालकमंत्री देसाई
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य परिस्थितीतील असतात. त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती आपल्या जिल्ह्यात होवू नये, यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रत्येक शासकीय रुग्णालयात सहा महिने पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा सर्व शासकीय रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, वैद्यकीय उपकरणे यांच्यासाठी आदर्श प्रणाली जिल्हा प्रशासनाने तयार करावी. रुग्णालयांनी त्या प्रणालीनुसार मागणी करावी. त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.