हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gudi Padwa 2024) दिनदर्शिकेत दाखवल्याप्रमाणे या वर्षात उद्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले त्या दिवसापासून ‘गुढीपाडवा’ साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन झाले तेव्हा सर्वत्र विजयाची गुढी उभारण्यात आली आणि प्रत्येकाने आपापल्या घरांवर ध्वज फडकावला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण हिंदूंच्या घरी साजरा केला जातो. या दिवसाला विशेष महत्व आहे. कारण गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा खास दिवस आहे.
गुढीपाढवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे घरोघरी आनंद असतो. ज्याच्या त्याच्या घरी आनंदाची गुढी उभारली जाते, दारी आंब्याचे तोरण बांधले जाते, दारात उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढली जाते. (Gudi Padwa 2024) अनेक महिला अत्यंत सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढतात. पण काही महिलांना इतक्या सहजतेने रांगोळी काढणे जमत नाही. त्यामुळे अनेक महिला रांगोळी काढणे टाळतात. तुमच्याही बाबतीत असे घडत असेल तर हरकत नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या ट्रिक्स देणार आहोत ज्यांच्या साहाय्याने तुम्हीही रांगोळी सहज काढू शकाल.
उद्यावर गुढीपाडवा आहे. म्हणूनच आजची ही खास रांगोळी तुमच्यासाठी. युट्युबवर गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) स्पेशल रांगोळीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ Hashtag Rangoli नावाच्या युट्युबपेजवर शेअर केलाय. ज्यात अत्यंत सोप्प्या पद्धतीने काढता येईल अशी सुरेख गुढीची रांगोळी आपण पाहू शकतो. यासाठी फक्त १ पळी आणि काही बांगड्यांची आवश्यकता आहे. चला तर पाहूया कशी काढायची ही रांगोळी.
सोप्प्या पद्धतीने काढा गुढीची रांगोळी (Gudi Padwa 2024)
सगळ्यात आधी दारासमोर जिथे रांगोळी काढायची आहे तिथे एक पळी पालथी ठेवा. या पळीचा गोल भाग वरच्या बाजूस ठेवून दांडा खालच्या दिशेने ठेवा. पळीच्या दांडीपासून वरील भागापर्यंत गोलाकार पद्धतीने ६ बांगड्या ठेवा. या एका वक्ररेषेत ठेवलेल्या प्रत्येक बांगडीपर्यंत एक एक करून रांगोळी वापरून रेष ओढा. आता यात रंग भरा. साडीच्या निऱ्या दिसतील असे रंग यामध्ये भरून घ्या. आवडीनुसार रंगांची संगती करून गोलाकार चमचा त्यावर गोल फिरवा. मधोमध दुसरा रंग भरा. पुन्हा चमचा गोल गोल फिरवा आणि त्यात तिसरा रंग भरा.
यानंतर साडीच्या निऱ्यांवर गोल गोल ठिपके काढून त्यावर पळीच्या आकारानुसार रांगोळी काढा. आता पळी हळूच बाजूला काढून ठेवा. (Gudi Padwa 2024) या पळीच्या गोलाकार भागाला तांब्याचा आकार द्या. आता तुम्हाला गुढीचा आकार दिसेल. यात सुंदर रंग भरा आणि गुढीच्या तांब्यावर स्वस्तिक काढा. मग फुलांची माळ रेखाटताना पिवळा आणि केशरी रंग वापरा. या गुढीच्या काठीवर नागमोड्या ओळीत मोठे ठिपके काढा आणि त्यावर पेनाने ठिपके देऊन फुलाचा आकार द्या. मग साखरेची शुभ्र गुढी दाखवताना रांगोळीतील साडीवर ४-५ पांढऱ्या रांगोळीचे ठिपके काढा. हे ठिपके गोलाकार चमच्याने फिरवा. त्यानंतर पानांची माळ दाखवताना फुलांच्या शेजारी छोटे छोटे हिरव्या रंगाचे ठिपके द्या आणि पानांचा आकार द्या.
तयार झाली तुमची सुंदर आणि आकर्षक गुढीची रांगोळी. या गुढीपाडव्याला ही रांगोळी नक्की ट्राय करा आणि लोकांकडून कौतुक करून घ्या.