Gudi Padwa 2025| हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. यादिवशी घराघरांत गुढी उभारली जाते. यादिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होतो आणि विविध शुभ विधी संपन्न होतात.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तिथी
ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 वाजता समाप्त होईल. यावर्षी उदय तिथीला अधिक महत्त्व असल्याने गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा होणार आहे.
महत्त्वाचे मुहूर्त (Gudi Padwa 2025)
ब्रह्म मुहूर्त: पहाटे 4:41 ते 5:27
विजय मुहूर्त: दुपारी 2:30 ते 3:19
अभिजित मुहूर्त: दुपारी 12:01 ते 12:50
निशिता मुहूर्त: मध्यरात्री 12:02 ते 12:48
संध्याकाळचा शुभ वेळ: 6:37 ते 7:00
गुढीपाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व
गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) हा सण भारतीय संस्कृतीत नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. हा दिवस प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाशी आणि मराठा साम्राज्याच्या विजयचिन्हाशी जोडला जातो. दरवर्षी घरोघरी गुढी उभारून, तोरण लावून आणि गोडधोड पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.
गुढी उभारण्याचे महत्त्व
गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते. तिच्या उभारणीमागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. प्रभू रामाने या दिवशी लंकेवर विजय मिळवला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या विजयाची गुढी उभारली. त्यामुळे हा दिवस नवे संकल्प आणि विजयाचा संकल्प करण्याचा मानला जातो.
चैत्र नवरात्रीचा प्रारंभ
गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa 2025) दिवशी चैत्र नवरात्री सुरू होते. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भक्त उपवास करतात आणि विविध धार्मिक विधी पार पाडतात. गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करून देवी-देवतांचे आशीर्वाद घेतले जातात. यंदाच्या गुढीपाडव्याला अनेक शुभ योग जुळून आले आहेत, त्यामुळे हा दिवस अत्यंत मंगलमय ठरणार आहे.