गुजरात काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेलकडून पक्षाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजीचे नाट्य सुरु आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चाही केली. त्यानंतर गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

पटेलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विटकरत म्हंटले आहे की, “आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”

काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलने खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून ते देशासमोर आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच गुजरात काँग्रेसमधील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक म्हणून हार्दिक पटेलची ओळख होती. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल यांनी पक्षश्रेष्ठींबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

एकीकडे काँग्रेस नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणारे गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल, दुसरीकडे मात्र भाजपवर कौतुकाचा वर्षाव करत होते. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळेही ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता पटेल यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Comment