औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 141 कोटी 46 लाख 48 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरात अडकलेल्या साडेपाचशेहून अधिक लोकांची मदत करून सुटका करण्यात आलेली आहे तर 260 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास यंदा निसर्गाने हिरावुन घेतल. सप्टेबरमध्ये जिल्ह्याच्या अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती.
गेल्या दोन दिवसात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने 1 लाख 85 हजार 215 हेक्टरवरील पीकाचे, शेतीचे नुकसान झाले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. झालेले जीवित व वित्तहानी मिळून झालेले नुकसान हे 141 कोटी 46 लाख 48 हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोमवार (ता. २७) आणि मंगळवारी (ता. २८) झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी आणि त्यासाठी अपेक्षित निधी याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
दोन दिवसातील मुसळधार पावसाने 2 लाख 29 हजार 32 शेतकऱ्यांच्या 1 लाख 85 हजार 215 हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तब्बल 125 कोटी 94 लाख 62 हजार रूपयांच्या अर्थिक मदतीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 551 लोक पुरात अडकले होते. स्थानिक प्रशासन, तहसीलदार शोध व बचाव पथकामार्फेत या पुरात अडकलेल्या लोकांची मदत करून सुटका करण्यात आली आहे. तर 260 लोकांना स्थलांतरीत करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 152 जणांची तात्पुरत्या निवारागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पडली आहे. चार तलाव फुटल्याने 33 हेक्टर आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
अंदाजे झालेले नुकसान –
दोन दिवसात 6 जणांचा मृत्यू तर 30 दुभती जनावरे दगावली.
433 घरांची अंशतः पडझड
तीन शेततळ्यांचे नुकसान झाले
17 कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान
महावितरणच्या 216 पायाभुत सुविधांची हानी झाली आहे.
36 पुल वाहून गेले तर 33 किलोमीटरचे रस्ते खराब झाले.