चंदेरी दुनिया । रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनित ‘गली बॉय’ हा सिनेमा यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. जोया अख्तर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते ज्याचे प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही कौतुक झाले. हा चित्रपट काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला कारण सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट विभागात ‘गली बॉय’ ची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड झाली होती.
यासंबंधित घोषणा होताच चित्रपटाची संपूर्ण टीम खुश झाली होती. रणवीर, आलिया आणि टीम मधील इतर सदस्यांनी यापूर्वी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून आनंद व्यक्त केला होता.
पण असे दिसते की हा चित्रपट ‘द अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. 92 व्या अकादमी पुरस्कारासाठी नऊ विभागातील अंतिम शॉर्टलिस्ट केलेली चित्रपटांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात डॉक्युमेंटरी फीचर, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप अँड केशरचना, संगीत (मूळ स्कोअर), संगीत (मूळ गाणे), अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म आणि व्हिज्युअल इफेक्ट यांचा समावेश आहे.
परंतु दुर्दैवाने, ‘गली बॉय’ या यादीमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यास अपयशी ठरला आहे. ऑस्करने शॉर्टलिस्ट केलेल्या यादीनुसार, यापुढे हा चित्रपट या शर्यतीचा भाग नसणार आहे कारण निवडलेल्या 10 चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ चं नाव देण्यात आलेलं नाही .