…अन् उदयनराजेंची कॉलर स्टाईल नक्कल करत सदावर्ते सातारा कोर्टात पोचले (Video)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

गुणरत्न सदावर्ते यांची आज 4 दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. कोठडी संपल्याने सदावर्ते यांना दुपारी सातारा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालय परिसरात पोहचताच सदावर्ते यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलची नक्कल केली. सदावर्ते यांनी पोलिसांसमोरच थेट आपल्या दोन्ही हातानी शर्टवरील कॉलर उडवत उदयनराजे स्टाईल मारली. सदावर्ते यांचा कॉलर उडवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सातारा पोलिसांनी आज गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलीस कोठडीतून सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जात असताना सदावर्ते यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी कोर्टात पोहचताच सदावर्ते यांनी हसत हसत आपल्या दोन्ही हातानी शर्टची कॉलर उडवत खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईल कॉपीकेली. सदावर्ते यांना उदयनराजेंसारखी स्टाईल मारून काय संदेश द्यायचा होता का? त्यांना यातून अजून काही म्हणायचे होते का यावर मात्र त्यांच्याशी बोलता आलेले नाही.

दरम्यान, कोर्टात आज हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने याप्रकरणी आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.