औरंगाबाद | ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांचा हौदोस वाढतच आहे. शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणांवरून भररस्त्यावर दिवसाढवळ्या खुन पडत आहे, तर काही ठिकाणी चोरी, उद्योजकांना मारहाण होण्याच्या अनेक घडत आहेत. गुन्हेगार शहरात नंग्या तलवारी, चाकु सुरे घेऊन बिनधास्त रस्त्यावर वावरत आहेत. त्यामुळे शहरात आता गुंडाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यातच उद्योजकांवर दिवसेंदिवस होणाऱ्या वाढत्या हल्ल्यामुळे त्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील रेल्वेस्टेशन जवळील भोगले ऑटोमोबाईल्समधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहा ते पंधरा जणांच्या जमावाने मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. या कंपनीतील एक कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत नव्हता. त्यामुळे त्याला लेखी जाब मागण्यात आला होता. त्याला त्याचे काम न देता अन्य काम देण्यात आले होते. त्याचा राग मनात ठेवून या कर्मचाऱ्याने कंपनीतील हात धुण्यासाठी ठेवण्यात आलेले द्रवरुप साबणाचे पाणी पिले. यामुळे तो कोसळल्यानंतर त्याला कंपनीच्या प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले. बजाज रुग्णालयात त्यावर उपचार सुरू असतानाच त्याचे आई वडील कंपनीत आले. त्यांनी जातीयतेतून अन्याय केल्याचा आरोप केला. ते बाहेर पडतात न पडतात तोच एका टोळक्याने कंपनीत प्रवेश केला. आराडाओरडा करत कर्मचाऱ्यांना आणि मनुष्यबळ विभागाच्या प्रमुखास मारहाण केली. असे करताना नाहक जातीयवादी असल्याचेही आरोप केले.
एकंदरीतच या सर्व प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. या मारहाण प्रकरणी तीन आरोपींना सातारा पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दासरे हे करत आहेत.