कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान रमजान देसाई (रा. गोटे, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोटे गावच्या हद्दीत इम्रान देसाई हा त्याच्या मालकीचे अम्मार स्टोअर्स नावाच्या दुकानात स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदेशीर पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करत असल्याची माहिती डीवायएसपी कार्यालयातील पोलीस हवालदार सागर बर्गे यांना मिळाली. त्या अनुषंगाने डीवायएसपींच्या पथकाने सदर ठिकाणी जावून छापा टाकला होता.
इम्रान देसाई यांच्या कब्जामध्ये असलेले 6 हजार 240 रूपये किमतीचे विमल पानमसाला निळा, 43 हजार 680 रूपये किमतीचे विमल पानमसाला पिवळा, 2 हजार 250 रूपये किमतीची तंबाखू, 10 हजार 920 रूपये किमतीचे तंबाखू, 12 हजार 720 रूपये किमतीचा हिरा पान मसाला असा एकूण 75 हजार 810 रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणी इम्रान देसाई याला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर बर्गे, प्रविण पवार, दिपक कोळी यांनी केली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा