मुंबई । कोरोना संकटामुळं यावर्षीच्या सर्वच सण, यात्रा, उत्सवांवर विरजण पडलं आहे. कोरोना संसर्गामुळं यावर मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा फटका यंदाच्या हज यात्रेलाही बसला आहे. यंदाची हज यात्रा कोरोनामुळं रद्द करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय हज समितीकडून माहिती देण्यात आली असून यात्रेकरूंना त्यांचे पैसे परत देण्यात येणार आहेत. सौदी प्रशासनाकडून कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने यावर्षीची हज यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेकरूंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना परत दिली जाणार असल्याचे केंद्रीय हज समितीकडून घोषित करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी दिली.
कोरोना संसर्गाचा वाढत असताना १३ मार्च २०२० पासून सौदी प्रशासनाने हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविली होती. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा होती. दरवर्षी हजची तयारी फार आधीपासूनच करावी लागते. त्यानंतर पुढील सूचना येणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप यात्रेसंबंधी कोणताही सूचना आलेली नसल्याने आता यात्रा रद्द झाल्याचे आपल्या देशातील केंद्रीय हज समितीने घोषित केले आहे.
पैसे परत मिळवण्यासाठी असा करा अर्ज
यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर असलेला यात्रा रद्द करण्याचा फॉर्म भरून तो ceo.hajcommittee@nic.in या इ-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी. त्यानुसार त्यांना पैसे परत करण्यात येणार आहेत.
इतिहासात २२२ वर्षांनंतर ही यात्रा रद्द
यापूर्वी १७९८ ते १८०१ मध्येही हज यात्रेत खंड पडला होता. त्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा कोरोनामुळे २२२ वर्षांनी ती रद्द करण्यात आली आहे. हजपेक्षा वेगळी पण मक्का मदिनेतच होणारी ‘ उमरा ’ ही यात्रादेखील सौदी सरकारने फेब्रुवारीत रद्द केली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in