सेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र न मिळाल्याने जितेंद्र पाटील संतप्त
जळगाव प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतली जाणारी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने येथील विराज पार्क भागातील पीएच़डी करणाऱ्या जितेंद्र शालीक पाटील या अंध विद्यार्थ्यांने राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे एम.ए.च्या परीक्षेत ग्रेस मिळाले असताना सेट परीक्षेपूर्वी आयोगाने अर्ज न तपासल्याने जितेंद्र यांची पायपीट होत आहे.
जितेंद्र पाटील हे ‘अंध आणि अपंगांची सद्यस्थिती’ या विषयावर पीएच़डी करीत आहेत. सोबत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षादेखील दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. मात्र एम.ए.च्या परीक्षेत तीन गुणांची ग्रेस मिळाली असल्याने सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. ग्रेस मिळालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा देता येत नाही. जितेंद्र पाटील हे अंध विद्यार्थी गेल्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देत आहेत. त्यावेळी आयोगाने परीक्षेचा अर्जदेखील तपासला नाही.
मात्र जेव्हा ते सेट उत्तीर्ण झाले त्यावेळी आयोग जागे झाले आणि प्रमाणपत्र आवश्यक असल्यास गुणांकन सुधारण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. सदर प्रश्न सोडविण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली असता त्यांनी राज्यपालांकडे अर्ज करण्याचा सल्ला दिल्याचे जितेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.