हनुमानवाडीच्या अचानक गणेश मंडळांने सामाजिक बांधिलकी जपली : अजय गोरड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | समाजातील चांगल्या गोष्टींना प्रेरणा देण्यासाठी व समाज एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. आज समाज प्रबोधनपर उपक्रम राबवून हनुमानवाडी येथील अचानक गणेश मंडळांने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी काढले.

हनुमानवाडी येथील अचानक गणेश मंडळ यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अजय गोरड यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात 40 युवकांनी रक्तदान केले. यावेळी सरपंच उत्तम कदम, उपसरपंच आनंदराव अर्जुगडे, पोलिस पाटील किरण हत्ते, माजी सैनिक राजेंद्र अर्जुगडे, डॉ. विक्रमसिंह अर्जुगडे, शिवाजी धनवे यांच्यासह गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

अजय गोरड म्हणाले, तरुणांनी डॉल्बी, डीजे याच्यावरती खर्च करण्यापेक्षा समाजात अनेक गरजवंत आहेत. ज्यांना मदत न मिळाल्यामुळे अनेकदा जीव गमवावे लागतात‌. तसेच योग्य दिशा मिळण्यासाठी तरुण वयात युवकांनी संघटन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे युवक भरकटला जाणार नाही आणि पुढची पिढी ही चांगली घडेल. यासाठी आता गणेशोत्सवात ही तरुणांनी प्रबोधनपर कार्यक्रम ठेवणे गरजेचे आहे.