हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरु केलं आहे. आजपासून म्हणजेच ९ ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात होणार असून १५ ऑगस्ट पर्यंत ते चालणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना त्यांच्या घरावर आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच प्रत्येकाने आपल्या व्हाट्सअप डीपीवर तिरंग्याचा फोटो ठेवावा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे . हर घर तिरंगा या मोहिमेची सुरुवात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत
तिरंग्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी- Har Ghar Tiranga Abhiyan
हर घर तिरंगा या मोहिमेच्या दरम्यान, सर्व राज्यांनी देशाचा राष्ट्रध्वज आणि तिरंग्याबाबत लोकांमध्ये जागृती करावी तसेच तिरंग्याशी जोडण्यासाठी उपक्रम राबवावे अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, हर घर तिरंगा मोहिमेत यंदा जास्तीत जास्त नागरिक सहभागी होऊन एक नवा इतिहास रचतील. यापूर्वी 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबत सुरू झालेल्या या मोहिमेत एकूण सहा कोटी लोकांनी तिरंग्यासह त्यांचे फोटो मंत्रालयासोबत शेअर केले होते. तर 2023 मध्ये दहा कोटी लोकांनी तिरंग्यासोबतचे फोटो पाठवले होते. यंदा ही संख्या आणखी वाढणार आहे.
गजेंद्रसिंह शेखावत पुढे म्हणाले की, हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga Abhiyan) या अभियानांतर्गत प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकावण्याबरोबरच तिरंगा रॅली, तिरंगा दौड, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान लोकांना भारताचे तिरंगा चिन्ह कसे अस्तित्वात आले हे देखील सांगितले जाईल. या मोहिमेदरम्यान 13 ऑगस्टला देशातील खासदार तिरंगा बाईक रॅलीही काढणार आहेत. ही रॅली भारत मंडपमपासून नॅशनल स्टेडियमपर्यंत सुरू होईल. त्यात सहभागी होण्यासाठी सर्व खासदारांना निमंत्रित करण्यात आल्याचे शेखावत यांनी सांगितले.