मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वीच आयसीसीने आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवून संघ बांधणीला सुरुवात करत आहेत. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न बीसीसीआय समोर आहे. याच दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या मागील काही काळापासून फॉर्ममध्ये नसल्याने त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे.हार्दीकची जागा घेण्यासाठी काही नवे अष्टपैलू खेळाडू तयार असल्याने त्यामुळे हार्दीकचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्दीकची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू असून यातील तीन खेळाडूंकडून हार्दिकला सर्वात जास्त धोखा आहे.
‘हे’ आहेत तीन अष्टपैलू खेळाडू
यामध्ये पहिला नंबर लागतो तो शिवम दुबेचा. हार्दीकप्रमाणे स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजीचा भार शिवम दुबे पेलू शकतो. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या शिवमने आयपीएलमध्ये आरसीबीकडूनही चांगल प्रदर्शन केलं आहे. सध्या तो राजस्थान रॉयल्स संघात असून आगामी आयपीएल त्याच संघातील स्थान निश्चित करेल.
शिवमनंतर भारतीय संघात पंड्याची जागा घेण्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणजे पालघरचा शार्दुल ठाकूर. एक गोलंदाज म्हणून संघात असणारा शार्दूल फलंदाजीतही दिलासादायक कामगिरी करताना दिसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात त्याने याची झलक दाखवली आहे. नुकतंच त्याने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांत पदार्पण केलं असून 34.50 च्या सरासरीने 69 धावासुद्धा केल्या आहेत.
अखेरचा पण मजबूत पर्याय म्हटलं तर श्रीलंका दौऱ्यात सर्वांची मनं जिंकणारा दीपक चाहर याचे नाव पुढे येत आहे. एक मुख्य गोलंदाज असणाऱ्या दीपकने श्रीलंका दौऱ्यात अत्यंत महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट असं अर्धशतक ठोकत श्रीलंकेच्या तोंडातून विजय हिसकावून आणला. त्यामुळे पंड्याच्या जागी तोही एक उत्तम पर्याय ठरु शकतो.