अकोला प्रतिनिधी। अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय. मात्र, मुर्तिजापुरात आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पिंगळे यांनी केलेलं ताज भाषण जिल्हा भाजपातील गटबाजी कोणत्या थराला गेली आहे याचेच संकेत देणारे आहे.
पिंगळे यांनी भाषणात यावेळी लक्ष केले ते स्वपक्षाचेच गृहराज्यमंत्री असलेले रणजित पाटील यांना. विशेष म्हणजे पिंपळेच्या भाषणाला खुद्द दाद दिली ती भाजपचेच केंद्रीय राज्यमंत्री असलेले संजय धोत्रे यांनी. त्यामुळे जिल्हा भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही हाच सूचक संदेश यातून मिळत आहे.
पिंगळे यांच्या भाषणाची तीव्रता बघता विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार असतांना सुद्धा त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टिका केली. पिंगळे यांनी आपल्या भाषणात पाटील यांचे थेट नाव घेतलं नसलं तरी जिल्ह्यातील मंत्री, डॉक्टर, पक्षाचे पदाधिकारी असे शब्द वापरत पिंपळेंनी रणजित पाटलांचा उद्धार केला. मात्र, स्वपक्षातील व्यक्तीनेच घराचा आहेर दिल्याने जिल्हा भाजपात खळबळ उडाली आहे.