हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा काँग्रेसला (Congress) सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची सूत्रे बदलल्यावर लक्ष केंद्रित करत आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पद बदलण्यासाठी घडामोडी सुरू आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवे नेतृत्व आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे सध्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सपकाळ हे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित ग्रामस्वराज्य संकल्पनेशी निगडित आहेत. त्यांनी विविध युवक शिबिरे, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्शग्राम चळवळीच्या माध्यमातून विकासात्मक उपक्रमांना चालना दिली आहे.
तसेच, २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण आणि जलव्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे राबवला. या प्रकल्पामुळे पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यास मदत झाली. ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. आता महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद देखील सपकाळ यांच्याकडे जाऊ शकते.
दरम्यान, दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाने राज्यातील संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळ पक्ष अशा व्यक्तीकडे महाराष्ट्रातील जबाबदारी सोपवणार आहे जो पूर्ण वेळ संघटन बांधणीकडे आणि राजकीय कारभार चालवण्याकडे लक्ष देईल. हर्षवर्धन सपकाळ हे असेच व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्याकडे पक्ष ही जबाबदारी सोपवू शकतो. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.