उपमुख्यमंत्र्यांचा विरोध! शेतकऱ्यांनी चक्क हेलिपॅडचं काढलं खोदून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिंद । केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज २८ वा दिवस आहे. या आंदोलनाला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे सरकार आणि भाजप हैराण झालं आहे. असं असलं तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, या निर्णयावर सरकार अद्याप ठाम आहे. तर दुसरीकडे, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतलीय. केंद्रातील भाजप सरकारच्या या भूमिकेचा सर्वात जास्त परिणाम सहन करावा लागतोय, तो हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारला. राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनाही या आंदोलनाचा फटका बसलाय.

हरयाणाच्या जींद जिल्ह्याच्या उचाना भागात शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या आगमनासाठी बनवण्यात आलेल्या हेलिपॅडची जागाच खोदून काढलीय. या दरम्यान जननायक जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्याविरोधात नारे लगावताना ‘दुष्यंत चौटाला गो बॅक’ अशा घोषणाही करण्यात आल्या. गुरुवारी दुष्यंत चौटाला यांचं हेलिकॉप्टर या हेलिपॅडवर उतरणार होते. परंतु, शेतकऱ्यांचा विरोध पाहता चौटाला यांना आपला हा दौराच रद्द करावा लागलाय.

जेव्हापर्यंत दुष्यंत चौटाला शेतकऱ्यांचं समर्थन करत नाहीत तेव्हापर्यंत त्यांना या परिसरात येऊ न देण्याची भूमिका स्थानिकांनी घेतलीय. सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्या दुष्यंत चौटाला यांनी शेतकऱ्यांसाठी राजीनामा देऊन शेतकऱ्यांचं समर्थन करावं. इथे जो नेता येईल त्याचा अशाच पद्धतीनं विरोध केला जाईल, असंही स्थानिकांनी म्हटलंय.

काळे झेंडे दाखवले म्हणून शेतकऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा
मंगळवारी शेतकऱ्यांनी अंबालामध्ये मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा विरोध केला होता. खट्टार आगामी स्थानिक निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ एका सभेसाठी शहरात येणार होते. मुख्यमंत्री अंबालाला दाखल होणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या स्थळाकडे कूच करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेरलं होतं. मुख्यमंत्र्यांना त्यांनी काळे झेंडेही दाखवले होते. त्यानंतर १३ शेतकऱ्यांविरोधात हत्या आणि दंगलीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment