स्थलांतरित मजुरांवर हरियाणा पोलिसांचा लाठीहल्ला, जीव वाचवण्यासाठी मजूर संसार रस्त्यावर टाकून पळाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरियाणातील यमुनानगर परिसरात गावी परतत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी लोकांनी आसपासच्या शेतांचा आधार घेतला, मात्र त्या शेतांतूनही पाठलाग चालूच ठेवत पोलिसांनी कामगारांना नाकीनऊ आणलं.

देशभरातून कधी पायपीट करून, कधी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर होणारा अन्याय या काही दिवसांत आपल्याला काही नवीन नाही. रोज नव्याने स्थलांतरितांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनेक घटना आपण ऐकत आहोत. कित्येक मैल प्रवास करून आपल्या गावी परतणाऱ्या काही कामगारांसोबत हरियाणा येथील यमुनानगर परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केला. घाबरलेल्या कामगारांनी तिथून पळ काढला पण या नादात त्यांचा संसार रस्त्यावरच पडला. अनेकांच्या सायकली, पायातल्या चपला, कपडे, जीवनावश्यक वस्तू अशा अनेक गोष्टी तिथेच टाकून हे लोक पळून गेले. काहींनी बाजूच्या शेतात धाव घेतली तर काहीजण आल्या रस्त्याने परत गेले. 

स्थलांतरित कामगारांना आपल्या गावी परत पाठविण्यासाठी ज्यापद्धतीने सरकार श्रमिक रेल्वेची सुविधा उपलब्ध करत आहे त्याप्रमाणे गावी परतणाऱ्या या कामगारांसाठीही काही पावले उचलणे गरजेचे आहे. यांना मारहाण करून, हाकलवून दिल्यास यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.  त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांची सोय करीत, त्यांच्यासाठी अलगाव सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने घालवलेल्या कामगारांनी काय करायचे, कुठे जायचे, काय खायचे असे अनेक प्रश्न अशा वागणुकीमुळे उभे राहतात. पायी प्रवास करून परतणाऱ्या या कामगारांसाठी ठोस पाऊल उचण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment