हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आन बाण आणि शान असलेला महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) संघाला गरज असतानाही ८ व्या आणि ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने चाहत्यांनी तसेच अनेक क्रीडा समीक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. धोनीचं अगदी तळाला फलंदाजीला येणे CSK ला मारक ठरत असल्याचे मत अंबाती रायुडूने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. धोनी २ बॉल जरी खेळला तरी त्याचे चाहते खुश होतात हा भाग वेगळा, पण टीमला त्याचा म्हणावा तसा उपयोग होईना झालाय… याबाबत चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षण स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांना छेडलं असता त्यांनी धोनीच्या बॅटिंग ऑर्डर बाबतचा सगळा प्लॅन सांगून टाकला.
स्टीफन फ्लेमिंग म्हणाला, हे वेळेचे गणित आहे. धोनी स्वतः याचा अंदाज घेतो. त्याचे गुडघे काही काळापूर्वीसारखे राहिले नाहीत. तो व्यवस्थित हालचाल करत आहे हि गोष्ट खरी आहे, परंतु धोनी १० षटके फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळेच धोनी मॅचच्या दिवशीच ठरवतो कि तो संघाला काय देऊ शकतो. जर सामना संतुलित असेल तर तो थोडा लवकर फलंदाजी करायला येतो, उर्वरित वेळी तो इतर खेळाडूंना संधी देतो. परंतु धोनी आजही चेन्नई सुपर किंग्स साठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचे नेतृत्व आणि विकेटकीपिंग खूप महत्वाचे आहे, म्हणून धोनीला ९-१० षटके फलंदाजीसाठी पाठवले जाणार नाही. त्याने असे कधीच केले नाही. तो फक्त १३-१४ षटकांनंतर फलंदाजीला येतो. तो परिस्थिती काय आहे ते बघेल आणि त्यानुसारच मैदानात उतरेल.
दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सचा ६ धावांनी पराभव केला. १८३ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची दमछाक झाली. अखेरच्या काही षटकात राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून बॉलिंग करत १८३ धावांचे टार्गेट डिफेंड केलं. महेंद्रसिंघ धोनी आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज फलंदाज मैदानावर असूनही चेन्नई विजय मिळवता आला नाही. कालच्या सामन्यात धोनी ७ व्या क्रमांकांवर फलंदाजीला आला होता. त्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. अखेरच्या षटकात संघाला २० धावांची गरज असताना तो बाद झाला आणि चेन्नईच्या विजयाची आशा संपुष्टात आली.