धक्कादायक ! दोन वर्षीय मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील काही महिन्यांपासून मराठवाड्याची राजधानी गुन्हेगारांची राजधानी बनत आहे. शहरात दिवसागणिक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. अशातच शहरातील दलालवाडी परिसरातील दोन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला चक्क कपाटात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली. मात्र सुदैवाने आसपासच्या नागरिकांना मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने या आरोपिचे बिंग फुटले आणि या मुलीचे प्राण वाचले. मात्र या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांना अपहरणकर्त्याला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेविषयी क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दलालवाडीत राठी यांची इमारत आहे. त्यांनी इमारतीतील एक खोली नुकतीच शशिकांत दिलीप भदाने याला किरायाने दिली होती. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास या खोलीतून चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. घरात कुणी नसताना रडण्याचा आवाज कसा येतोय, हा प्रश्न पडल्याने गल्लीतील नागरिक गोळा झाले. खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. नागरिकांनी कुलूप तोडले. आत प्रवेश केला तेव्हा भिंतीत असलेल्या लाकडी कपाटातून आवाज येत असल्याचे समोर आले. नागरिकांनी कपाट उघडताच एक लहान मुलगी कपाटात आढळून आली. कपाटात आढळलेली ही मुलगी बाजूच्याच गल्लीतील रहिवासी असल्याचे समोर आले. संध्याकाळपासून ती घरातून गायब होती. तेव्हापासून घरचे लोक तिचा शोध घेत होते. नागरिकांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचा शोध सुरु केला तेव्हा तो बाजूच्या गल्लीत संशयितरित्या फिरताना दिसला. नागरिक दिसताच त्याने धूम ठोकली. पण त्याचा पाठलाग करत लोकांनी त्याला पकडले व बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी त्याला घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या तावडीतून आरोपींची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment