ज्याला पडत्या काळात दिला रोजगार, निवारा, त्याने त्यांच्याच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

औरंगाबाद – एका विवाहित तरुणाने 16 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. राहुल रमेश गायकवाड असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

पडत्या काळात रोजगार, अन्न, निवारा दिलेल्या रिक्षा मालकाच्या मुलीवरच आरोपीची वाईट नजर होती. अनेकवेळा रिक्षा मालक आरोपीस त्याच्या घरी राहण्यास जागा देत असत. विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने रिक्षा मालकाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाकडील रिक्षा चालविण्यासाठी आरोपी राहुल रमेश गायकवाड (24, रा. वाळूज) येत असे. त्या कुटुंबाच्या घरीच अनेकवेळा राहत होता. या संबंधाचा गैरफायदा घेत कुटुंबातील अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून 13 नोव्हेंबर रोजी घरातून पळवून नेत अहमदनगरातील एका लॉजवर अत्याचार केले.

त्यापूर्वीही पीडितेच्या घरी तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. निरीक्षक शरद इंगळे यांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. पीडितेच्या सुधारित पुरवणी जबाबानुसार पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराच्या कलमांचा समावेश करण्यात आला. सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे अधिक तपास करत आहेत.