फ्रेंडशिप बॅंड द्या म्हणत दुकानात गेले अन् सोन्याची साखळी हिसकावून पसार झाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद| एका जनरल स्टोअरवर ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत त्यांनी फ्रेंडशिप बेल्टची मागणी केली. हा फ्रेंडशिप बेल्ट देतानाच वृद्धेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजन असलेली सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची फिल्मी स्टाईल घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अरिहंतनगरमध्ये घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील अरिहंतनगर येथे अरिहंत जनरल स्टोअर्स दुकान आहे. या दुकानात चंपाबाई पूनमचंद पाटणी (वय ७५, नाथनगर, अरिहंतनगर) दुपारी तीन वाजता बसल्या होत्या. दुकानातील नातेवाईक जेवणासाठी घरी गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. ३ वाजून १५ मिनिटांनी दोघेजण काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यांनी ५०० रुपयांचे सुटे पैसे मागितले. दुकानातील चंपाबाई यांनी सुटे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर १५ मिनिटांनी ते दोघे परत दुकानात आले. त्यांनी फ्रेंडशिप बेल्ट आहेत का? असे विचारले. तेव्हा दोघांपैकी एकजण दुचाकीवर जाऊन बसला. दुसरा फ्रेंडशिप बेल्ट कापून देत असलेल्या वृद्ध महिलेकडे पाहत होता. फ्रेंडशिप बेल्ट घेऊन महिला काउंटरवर येताच तयारीत असलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या वृद्धेने तीन मिनिटांनंतर आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला होता.

या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देताच निरीक्षक संतोष पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेत परिसराची पाहणी केली. या प्रकरणी चंपाबाई पाटणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करीत आहेत.

Leave a Comment