Wednesday, June 7, 2023

शरीर सुखाची मागणी करणाऱ्या हेडमास्टरला नागरिकांकडून मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये काही लोकांनी सरकारी शाळेतील हेड मास्टरच्या ऑफिसमध्ये घुसून त्याला मारहाण केली आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.

हेड मास्टरवर आरोप करण्यात आला आहे कि, त्याने एका नर्सच्या मोबाइल नंबरवर काही अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले. या आरोपी हेड मास्टरचं नाव सुरेश चावलागी असे आहे. आरोपी हेडमास्तर हे कित्तूर तालुका हेड मास्टर असोसिएशनचे अध्यक्षही होते. दोन आठवड्यांपूर्वी आरोपी हेड मास्टर आणि पीडित नर्सची भेट झाली होती. लसीकरण अभियानादरम्यान या दोघांची भेट झाली होती.

यानंतर त्याने पीडितेचा फोन नंबर मिळवून कथित स्वरुपात तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी मेसेज पाठवायला लागला. यानंतर नर्सने त्याला अनेकदा इशारा दिला. तरीदेखील तो मेसेज पाठवित होता. यानंतर पीडितेने आपले नातेवाईक आणि मित्रांसह आरोपी हेड मास्टरच्या ऑफिसमध्ये घुसून त्याला मारहाण केली. यानंतर शिक्षण विभागाने आरोपी हेडमास्टरला शुक्रवारी निलंबित केले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.