कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वयोवृद्ध हृदयविकारग्रस्त रूग्णांवर काही वेळा बायपास शस्त्रक्रिया करणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी या रूग्णांसाठी ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हृदय शस्त्रक्रिया करणे अधिक फायदेशीर ठरते. अशाप्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी एका ८६ वर्षीय रुग्णावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेली अशाप्रकारची ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
म्हासोली (ता. कराड) येथील रहिवासी अनंत कुलकर्णी (वय – 86) यांनी छातीत दुखू लागल्याने कराडमधील एका खासगी रूग्णालयात आपली तब्येत दाखविली. त्यावेळी त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. याठिकाणी श्री. कुलकर्णी यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांची भेट घेतली. त्याठिकाणी त्यांच्या हृदयविकारासंदर्भातील चाचण्या केल्या असता, त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कॅल्शियमयुक्त प्लाक असल्याचे लक्षात आले व त्यांना बायपास शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान करण्यात आले. पण त्यांचे वय ८६ वर्षे असल्याने, तसेच या वयात मधुमेहासारख्या व्याधी जडल्याने हृदयाची आकुंचन – प्रसरण पावण्याची क्षमता कमी झालेली असते. अशावेळी बायपास करणे धोक्याचे असल्याने, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून श्री. कुलकर्णी यांच्यावर ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार डॉ. विजयसिंह पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. ‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून करण्यात आलेली ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच हृदय शस्त्रक्रिया ठरली आहे. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत शेळके, डॉ. रमेश कावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल कृष्णा हॉस्पिटलचे, तसेच ही शस्त्रक्रिया यशस्वी करणारे डॉ. विजयसिंह पाटील यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे नेमकी उपचार पद्धती?
‘शॉकवेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी’ ही एक अत्याधुनिक व सर्वोत्तम उपचार पद्धतीचा आहे. हे एक सोनोग्राफिक आधारित तंत्रज्ञान आहे. या आधुनिक उपचारपद्धतीमध्ये एका बलूनमध्ये असणाऱ्या एमीटरच्या माध्यमातून ‘अल्ट्रा हायप्रेशर सोनिक वेव्हस’ हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील कठीण अशा कॅल्शियमला दिल्या जातात. त्यामुळे कॅल्शियम फुटण्यास मदत होते आणि धमन्यांचा आकार मोठा करता येतो व रक्तपुरवठा सुरळित होतो. हे एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान असून, यामध्ये इतर कोणतेही साईड इफेक्ट होण्याची शक्यता अगदीच कमी असते.