हळवा कोपरा । समीर गायकवाड
थायलंडमधील काओ येई राष्ट्रीय अभयारण्यामध्ये एका कळपातील आठ हत्तींनी रस्ता अडवून धरल्याने तिथला वनअधिकारी ताठकळून गेला, थोड्या वेळाने हत्ती आपण होऊन एकाच दिशेने उदासपणे निघून गेले. त्या हत्तींच्या मागे गेल्यावर एका धबधब्याजवळ त्याला दोन हत्ती अगदी टोकाच्या कडेवर उभे असल्याचे दिसले. अधिकाऱ्यास राहवले नाही त्याने जवळ जाऊन पाहिलं. तर अत्यंत हृदयद्रावक दृश्य त्याला दिसलं. तळाशी तीन वर्षांच्या एका छोट्या हत्तीचा मृतदेह त्याला दिसला.
बेचैन होऊन त्यानं तळापाशी उतरून जाऊन पाहिलं तर आणखी पाच हत्तीचे मृतदेह आढळून आले. कदाचित हत्तीच्या त्या पिलाचे ते आई वडील असतील, भाऊबंद असतील, मित्र असतील !! घटना घडून दोनतीन दिवस झाले तरी ते दोन हत्ती तिथेच उभे होते, काय विचार करत असतील ते ? कळपातले ते दोन हत्ती किती कठीण अवस्थेत उभे होते याची कल्पना सोबत दिलेल्या व्हिडीओतून येईल. पिल्लाला वाचवण्याच्या नादात कळप खाली कोसळल्यानंतर कळपातील ते दोघेजण त्या धबधब्याच्या बाजूने निम्मा डोंगर उतरून अर्ध्यात आले आणि धबधब्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिले. कदाचित त्यांना वेडी आशा असावी की आपले प्रियजन आता तरी आपल्या नजरेस पडतील ! पण तसे होणे नव्हते… नात्यांची ही दास्तान अत्यंत आर्त करुण अशीच आहे.. तर मृत हत्तींच्या शोकाने गहिवरून गेलेल्या हत्तींना ही घटना उघडकीस यावी म्हणून रस्ता अडवण्याची कल्पना कशी सुचली असेल हा प्रश्नही काळीज पोखरून टाकणारा आहे.
हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हत्ती आपल्या कळपाची आणि कळपातील प्रत्येक सदस्याची काळजी घेताना दिसतात. अनेकदा यासंदर्भातील वेगवेगळे किस्से व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून समोर येत असतात. अगदी कळपामधील प्रत्येक सदस्य सोबत घेऊन प्रवास करण्यापासून शिकाऱ्यांपासून आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी हत्तीणीने दिलेली झुंज असतो हत्तींमध्ये एकोप्याची भावना दिसून येते. मात्र याच एकोप्याच्या भावनेमुळे या सहा हत्तींना प्राण गमावावा लागला.
धबधब्यावरुन खाली पडणाऱ्या पिलाला वाचवायला जाऊन कळपातील इतर हत्तीही खाली पडल्याने सर्व सहा हत्तीचा जागीच मृत्यू झाला. धबधब्यावरुन खाली पडलेल्या मृत हत्तीचा फोटो थायलंड आणि शेजारी देशांत खूप व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या धबधब्याचे नाव ‘हेऊ नारोक’ (नरकातील धबधबा) असे आहे !!
या सर्व माहितीपेक्षा धक्कादायक माहिती अशी आहे की वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती अधिक काळ जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे प्राणी तज्ञांनी म्हटले आहे. हत्ती हे अन्न शोधण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच हत्ती हे मानसिकदृष्ट्या एकमेकांवर निर्भर असतात त्यामुळेच वाचलेल्या हत्तींना मानसिक धक्क्यातून सावरणे कठीण आहे. त्यामुळे ते आणखी खूप दिवस राहणार नाहीत.
प्राण्यांचे बरे असते, आपला साथीदार मरून गेला की जास्त आशाअपेक्षा न करता लवकरात लवकर आपणही मरून जायचं ! एकीकडे हे जीव आहेत आणि दुसरीकडे माणूस नावाचा प्राणी आहे जो अधाशासारखा हावरट पद्धतीने जगत राहतो, त्याला आणखी जगायचंय. खूप खूप जगायचं या नादात जगण्याचं सत्व हरवलं तरी जगत राहतो !!
व्हिडियो पाहण्यासाठी लिंक –