कराड | ग्रामपंचायत नळाला आलेले पाणी भरण्यावरून तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करत दगड व लोखंडी कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याची घटना शेळकेवाडी-म्हासोली येथे मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद निवास बंडू मोरे (वय 62, सध्या रा. केवाळे, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ रा. शेळकेवाडी-म्हासोली, ता. कराड) यांनी कराड तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भगवान बंडू मोरे, यशोदा भगवान मोरे, संगिता भगवान मोरे (सर्वजण रा. शेळकेवाडी-म्हासोली, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी श्रीनिवास मोरे यांच्या राहते घरात मंगळवारी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास ग्रामपंचायत नळाचे पाणी आलेले त्यांचा भाऊ भगवान याने श्रीनिवासच्या घरात येऊन तुमचा नळ बंद करा मला पाणी भरू द्या असे म्हणून शिवीगाळ केली.
त्यावेळी श्रीनिवासने भगवानला तु रोजच अगोदर पाणी भरतोस. मला आज अगोदर पाणी भरू दे, माझे पाणी भरून झालेवर मी नळ बंद करतो असे म्हणालेच्या कारणावरून भगवान याने त्याचे हातातील दगडाने श्रीनिवासच्या डोक्यात मारला. तसेच लोखंडी कोयता डोक्यात मारून जखमी केले. तसेच भावजय यशोदा व पुतणी संगिता यांनी शिवीगाळ करून तुला खल्लास करून टाकतो अशी धमकी दिली. याप्रकरणी श्रीनिवास मोरे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कांबळे करीत आहेत.