हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कडक उन्हाळ्याने महाराष्ट्रातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात देशातील काही भागात उष्णतेची लाट आल्यामुळे तर जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. अशा परिस्थितीतच नागरिकांना थंडावा देणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये पाऊस कोसळेल (Heavy Rain) असा अंदाज वर्तवला आहे. असे झाल्यास नागरिकांची या भयंकर गरमाईपासून सुटका होईल.
कोणत्या भागात पाऊस कोसळणार?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 दिवसांमध्ये तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल. परंतु पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा, रायलसीमामध्ये 3 मेपर्यंत कमाल तापमान 44-47 अंश सेल्सिअस राहील. त्याचबरोबर, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, यानममध्ये देखील उष्णतेची लाट येईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात पाऊस कोसळल्यास उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.
दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि लडाखमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील भागात हलक्या पावसाच्या सरीसह हिमवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, केरळ, दक्षिण तामिळनाडूत देखील मध्यम पाऊस पडू शकतो. मात्र पश्चिम बंगालच्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.