हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून गरमीने हैराण झालेला मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट बघत होता. अखेर काल पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचं आगमन तर झालं, पण हे आगमन इतकं दणक्यात झालं की, सगळीकडे पाणीच पाणीच अशी परिस्थिती पहायला मिळाली. पहिल्याच पावसाने मुंबईला असं काही झोडपून काढलंय की, लालबाग- परळ, दादर- हिंदमाता परिसरात पाणी साचलं. त्यामुळे पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई झालेली पहायला मिळाली. दरम्यान, या दृश्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहुयात.
मुंबई झाली तुंबई (Heavy Rainfall)
रविवारी संध्याकाळी मुंबईत धुवाँधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक सखल भागात नद्या तयार झालेल्या दिसल्या. संध्याकाळ आणि मध्यरात्र गाजवल्यानंतर पावसाने क्षणभर विश्रांती घेतली असली तरीही मुंबईतील बऱ्याच भागात साचलेले पाणी अद्याप ओसरलेले नाही. ज्यामध्ये लालबाग- परळ, दादर- हिंदमाता परिसराचा समावेश आहे. या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे बऱ्याच गाड्या बंद पडल्या, झाडं कोसळली तर गुडघ्याच्या वर पाणी साचल्यामुळे मुंबईकरांच्या जीवाचे नुसते हाल हाल झाले. जे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
दादर- हिंदमाता परिसरात जलमय परिस्थिती
दादरमधील हिंदमाता परिसरात प्रत्येक पावसात पाणी साचत हे प्रत्येक मुंबईकर जाणतो. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही पावसाच्या पहिल्याच सरीत दादरच्या हिंदमाता परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सोशल मीडियावर हिंदमाता परिसरातील काही दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
(Heavy Rainfall) हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर dadarmumbaikar नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘हिंदमाता भरलं म्हणजे पाऊस मोक्कार पडतोय असं गृहीतच धरावे लागते ..’.
पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच राहणार
मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर पुढच्या काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. रविवारनंतर आज सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rainfall) हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पुण्यात तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने कहर केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.