अतिवृष्टीचा तडाखा ! जिल्हा परिषदेच्या 245 कोटीच्या मालमत्तेचे नुकसान

औरंगाबाद – जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठ्याच्या योजना, रस्ते, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाच्या इमारतींना बसला आहे. या पावसामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती जी.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली आहे.

अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा अंतर्गत ४ पाणीपुरवठा योजनांचे १७.५० लाखांचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत विभागाअंतर्गत असलेल्या १४४ ग्रामपंचायत इमारतींचे १७.२८ कोटींचे तर इतर विभागाच्या ९८ इमारतींचे ११.७६ कोटी असे एकूण २४२ इमारतींचे २९.०४ कोटींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ६ हजार ६५५ किलोमीटरचे इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) आणि ग्रामरस्ते असून, यापैकी ६४३ किलोमीटर रस्त्यांचे (२११.४७ कोटी रुपयांचे) नुकसान झाले आहे. त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९.६४ कोटी रुपयांची गरज आहे. आरोग्य विभागाच्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे १२.५ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या २० बंधाऱ्यांना पावसाचा फटका बसला असून, ४ कोटी १९ लाखांचे नुकसान झाल्याचे गटणे यांनी सांगितले.

You might also like