कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून त्याचा फटका आता ढेबेवाडी भागालाही बसलेला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले असून लोकांना बाहेर निघण्यास मार्ग बंद झालेले आहेत. ढेबेवाडी कराड या मार्गावरील ढेबेवाडी गावाजवळील पुढेही पाण्याखाली गेलेला आहे. ढेबेवाडी- कराड हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील काढणे, जिंती, मालदन, काळगाव या भागातील वाहतूकीस असणारे पूल काल पावसाच्या पाण्याखाली गेले होते. तर ढेबेवाडी गावाला जोडणारा पूल व भागातील सर्वात उंच असलेला पूल पाण्याखाली गेलेला नव्हता. मात्र, शुक्रवारी दुपारी ढेबेवाडी गावाजवळील पूलही पाण्याखाली गेलेला आहे. ढेबेवाडी विभागात पावसाची संततधार कायम असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे ढेबेवाडी विभागातील अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. पावसाचे पाणी दुथडी भरून वाहन असून महिंद धरणाच्या पाणीसाठ्यात ही मोठी वाढ झाली आहे.