कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
दरवर्षी पावसाळा जवळ आला कि शहरातील धोकादायक व जीर्ण अशा असणाऱ्या इमारती कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटना घडतात. यंदाही अशा स्वरूपाच्या घटना कराड शहरात घडू लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कराड शहरातील लाहोटी कन्या शाळेनजीक असलेल्या दत्त मेडिकल येथील बागवानवाडा नावाच्या जुन्या इमारतीचा काही भाग गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसून इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे कराड शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
कराड शहरात गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लाहोटी कन्या शाळेनजीक असलेल्या दत्त मेडिकल नजीक बागवानवाडा नावाच्या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेकडे दिली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोसळलेल्या इमारतींच्या भागाची माती व दगड उचलून नेले.
या घटनेनंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित घटनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चाही केली असून कोसळलेली इमारत हि धोकादायक असल्याने त्याबाबत त्या इमारत मालकांना इमारत उतरून घेण्याबाबत पालिकेकडून नोटीसही देण्यात आली असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांनाही पालिकेकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. जर इमारती उतरवल्या नाहीतर त्या मालकांवर गुन्हाही दाखल करणार आहोत, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यावेळी म्हणाले.
कराड पालिका दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरविण्याबाबत नोटीसा देत असते. मात्र, शहरातील अनेक इमारती धोकादायक स्थितीत असूनही या इमारती उतरवल्या जात नाहीत. अनेक इमारती गर्दीच्या ठिकाणी असल्याने या इमारती वादळवार्यामुळे कोसळल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. पालिका इमारत मालकांना वेळोवेळी नोटीसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात या इमारती ढासळल्या तर मोठी हानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.