वादळी पावसामुळे नुकसान : ढेबेवाडी परिसरातील 25 घरांवरील पत्रे उडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी विभागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे विभागातील सुमारे 25 घरावरील पत्रे उडून गेले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढेबेवाडी विभागातील डोंगरावर असलेल्या कसणी, मत्रेवाडी, रूवले आदी गावाना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसात ढेबेवाडी विभागातील कसणीसह परिसरातील गावातील मातीच्या. कौलारु घरांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यात घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.

दुर्गम कसणी परिसरातील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीवरील छप्पर वादळात उडून गेले. गेल्या काही वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे. तेथील शकुंतला संपत चोरगे, शंकर नामदेव पाटील, नाना आवजी पाटील, शंकर आनंदा पाटील यांची घरे वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अन्य विसवर घरांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सरपंच महेंद्र गायकवाड यांनी दिली. पावसामुळे नुकसान झाल्याची घटना घडल्यानंतर सरपंच गायकवाड यांच्यासह पोलिस पाटील यशवंत पुजारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग मेथे- पाटील आदींनी कसणी व परिसरात फिरून नुकसानीची माहिती घेतली.

याशिवाय अन्य गावात ही नुकसानीच्या घटना घडलेल्या असून तेथील नुकसानीचा नेमका तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही. वादळी पावसाने जनावरांच्या चाऱ्याच्या गंजी तसेच कैऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची छप्परे वादळात उडून दूरवर जावून पडली असून संबधित घरातील लोकांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने सुदैवाने जीवित हानी घडली नाही. महसूल विभागाकडून पंचनामा झाल्यानंतरच परिसरातील नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल.

Leave a Comment