औरंगाबाद – राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड- चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने अडीच महिन्यांपासून जड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्ण असताना आठ दिवसांपूर्वी घाटातून जड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, काम अपूर्ण असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होत असून जड वाहनांची वाहतूक आता पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने औट्रम घाट आत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्या होत्या. यामुळे हा घाट पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून या घाटाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या घाटात जड वाहनांची वाहतूक बंद होती. तर कमी वजनाच्या चारचाकी दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होते. 8 नोव्हेंबर रोजी या घाटातून जड वाहनांची वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र, कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही कोंडी होऊ नये म्हणून पूर्ण दुरुस्ती न झाल्याने पुन्हा घाटात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी घाटात वाहतूक कोंडी झाल्याने मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व वाहक यांनी संपूर्ण रात्र घाटात जागून काढली.
सकाळपासून वाहतूक ठप्प झाल्याने ती तात्पुरती वाढवली जाऊ शकते, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे. वाहतूक शिऊर, नांदगाव मार्गे वळवल्याने वाहनधारकांना 120 किलोमीटरचा अधिकच फेरा वाढला असून इंधन व वेळ ही खर्च होणार आहे. दरम्यान, घाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक शिऊर- नांदगाव मार्गे वळवली असून पुन्हा घाटातून जड वाहनांची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, अशी माहिती महामार्ग पोलीस विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड यांनी दिली आहे.