विशेष प्रतिनिधी | झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मदतीने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या झारखंड मुक्ती मोर्चातर्फे प्रमुख नेते हेमंत सोरेन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. २०१४ साली वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी झारखंडचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावला होता. त्यांच्यासोबत आलमगीर आलम, रामेश्वर राव यांनीसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली.
देशभरात भाजप सरकारविरुद्ध नाराजीचा सूर असल्याचा फायदा घेत प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग राबवायला सुरुवात केली. महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याचं पहायला मिळालं.
हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबु सोरेन, काँग्रेसचे राहुल गांधी, अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, द्रमुकतर्फे एम.के.स्टॅलिन, कनिमोळी, राजदतर्फे तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसतर्फे ममता बॅनर्जी, जनता दल युनायटेडचे शरद यादव आणि आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. रांचीमधील मोरहाबादी मैदानावर हा सोहळा पार पडला.