अजबगजब!! ‘इथे’ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दैनंदिन जीवनातील आरामदायी दिवस म्हणजे रविवार. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत प्रत्येकासाठी रविवार हा आवडीचा दिवस असतो. कारण रविवार म्हणजेच सुट्टीचा वार. या दिवशी बहुतेक ऑफिस बंद असतात. शिवाय शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना रविवारी हमखास सुट्टी असते. त्यामुळे रविवार म्हटलं कि नुसता आनंदी आनंद. पण तुम्हाला ठाऊक आहे का..? आपल्या भारतात एक असं ठिकाण आहे, जिथे फक्त माणसांसाठी नव्हे तर प्राण्यांसाठी सुद्धा रविवार हा सुट्टीचा वार म्हणून ओळखला जातो.

होय. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आपल्या देशात एक असं ठिकाण आहे जिथे रविवारी माणसांप्रमाणे प्राण्यांनासुद्धा कामापासून सुट्टी दिली जाते. त्यामुळे रविवारी प्राणीसुद्धा मस्त आराम करतात. गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव असे प्राणी माणसाला शेती, माल वाहतूक, दळणवळण आणि उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत करतात. माणूस या प्राण्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण करू शकतो. त्यामुळे अनेकांच्या उत्पन्नाचे साधन म्हणून या प्राण्यांकडे पाहिले जाते. आता उत्पन्न निर्मिती करायची म्हणजे कामाचा व्याप मोठा असणार यात काही शंका नाही. मग इतकं काम केल्यानंतर प्राण्यांनासुद्धा सुट्टी नको का..? म्हणूनच झारखंडमधील एका गावात माणसांप्रमाणे प्राण्यांनासुद्धा रविवारी कामापासून आराम मिळावा म्हणून सुट्टी दिली जाते.

झारखंडमधील लातेहार हे गाव अत्यंत समृद्ध नैसर्गिक सौंदर्य, जंगल, वन उत्पादने आणि खनिजे यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याहून अधिक रविवारी प्राण्यांना सुट्टी देणारं गाव म्हणून हे जास्त चर्चेत आहे. या गावात प्राण्यांना सुट्टी देण्याची परंपरा गेली अनेक वर्ष सुरु आहे. लातेहार गावाजवळील अन्य काही गावांमध्येदेखील या परंपरेचे अनुकरण करण्यात आले आहे. यामध्ये हरखा, लालगडी, पक्रर आणि मुंगर या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील प्राण्यांना रविवारी आराम दिला जातो. त्यांच्याकडून कोणतेही काम करवून घेतले जात नाही.

लातेहार गावात वर्षानुवर्षे प्राण्यांना सुट्टी दिली जात आहे. हि परंपरा अनेक शतकांपूर्वी सुरु झाल्याचे गावकरी सांगतात. हि परंपरा सुरु होण्यामागे एक विशेष कारण आहे. हे कारण असे कि, साधारण दहा दशकांपूर्वी शेतात काम करत असताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. कामाला जुंपलेल्या जनावराचा मृत्यू होणे हि बाब गंभीर असल्याने ग्रामस्थांनी प्राण्यांबाबत मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्राण्यांनाही आठवड्यातून एक दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सुरु झालेली हि परंपरा आजतागायत या गावात पाळली जात आहे. माणसाप्रमाणे प्राण्यांनादेखील आरामाची गरज आहे, हि बाब लक्षात घेऊन लातेहार ग्रामस्थ आजही या परंपरेचे पालन करत आहेत.