वीर मरण : जवान शुभम पडवळ यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
शेंद्रे (ता. सातारा) येथील जवान शुभम दिलीप पडवळ यांना गुरुवारी पहाटे मनमाडजवळ ट्रेन अपघातात वीर मरण आले. पंधरा दिवसांची सुट्टी संपवून परत ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. दरम्यान, शुक्रवारी विराट जनसमुदायाच्या साक्षीने त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सारा परिसर हेलावून गेला.

जवान शुभम दिलीप पडवळ हे 169 मीडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ते 2018 मध्ये आर्मीमध्ये भरती झाले होते. काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी शेंद्रे या आपल्या गावी आले होते. परत ड्युटीवर जात असताना गुरुवारी पहाटे मनमाडजवळ ट्रेन अपघातात त्यांचे निधन झाले. अपघाताची बातमी समजताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. शुभम पडवळ यांचे पार्थिव गावी शेंद्रे येथे आणण्यात आले. झेंडा चौकातून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रालीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या होत्या. शुभमचे अखेरचे दर्शन घेताना कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात आई, वडिल, बहिण असा परीवार आहे.

‘शुभम पडवळ अमर रहे, भारत माता कि जय, वन्दे मातरम’ अशा घोषणांनी परिसर हेलावून गेला. पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. शोकाकूल वातावरणात वीर जवान शुभम यांना निरोप देण्यात आला. यावेळी 169 मिडीयम रेजिमेंटचे जेसीओ भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रांतधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस उपअधीक्षक शिंदे, पोनि विश्वजीत घोडके तसेच हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.