हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची गेल्या सात दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असं म्हटलं आहे. तसेच नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

”आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू”असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. ”आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही, असा कायदा करू. आंध्रपेक्षा कडक कायदा करू. नागरिकांनी संयम बाळगा’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच ‘हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.