कुटुंबातील जवळच्या नात्यांमध्ये विश्वासाच्या आधारावर अनेक गोष्टी घडतात . त्यातच जर जावई सासऱ्याच्या घरात राहत असेल, तर त्याचा त्या घरावर हक्क असतो का? अनेकांना वाटते की “आपलं माणूस आहे, राहू दे”, पण कायद्यात नातं नव्हे तर कागदाला महत्त्व असतं. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच यावर स्पष्ट भूमिका घेत निर्णय दिला आहे, जो भविष्यातील अनेक वादांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
भोपालमधील एका वादग्रस्त प्रकरणात जावयाने आपल्या सासऱ्याच्या घरावर हक्क सांगितला आणि त्यावरून मोठा कायदेशीर संघर्ष सुरू झाला. दिलीप नावाचा जावई आपल्या सासऱ्याच्या घरी वर्षानुवर्षे राहत होता. सुरुवातीला सासऱ्याच्या परवानगीने तो तिथे स्थायिक झाला, पण काही काळानंतर सासऱ्याने त्याला घर रिकामं करण्यास सांगितले. दिलीपने यास विरोध करत दावा केला की, त्याने त्या घरात 10 लाख रुपयांचे बांधकाम केले आहे, त्यामुळे त्याला त्या घरावर अधिकार आहे.
पण या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिली नाही. SDM आणि कलेक्टर स्तरावर त्याचा दावा फेटाळण्यात आला. शेवटी, मध्य प्रदेश उच्च न्यायालयात हा मुद्दा गेला आणि तिथेही दिलीपला धक्का बसला.
कोर्टाचा स्पष्ट निर्णय
- सासऱ्याच्या मालमत्तेवर केवळ नात्यामुळे किंवा आर्थिक मदतीमुळे जावयाचा कोणताही कायदेशीर हक्क सिद्ध होत नाही.परवानगीने घरात राहणं म्हणजे मालकी हक्क नव्हे. घरावर हक्क सांगायचा असेल तर कायदेशीर दस्तऐवज किंवा हस्तांतरण आवश्यक आहे.
या निकालातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. नात्यांमधील सौजन्य किंवा विश्वास, हा कायद्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी हक्क सिद्ध करत नाही. घरात राहण्यासाठी दिलेली तोंडी परवानगी, कधीही मागे घेतली जाऊ शकते आणि त्यावर आधार ठेवून हक्क सांगता येत नाही.
मुलामुलींच्या लग्नानंतर त्यांच्या जोडीदारांना घरात जागा दिली जाते, पण तीच जागा पुढे वादात बदलू शकते, जर त्याचे कायदेशीर स्वरूप ठरवले गेले नसेल तर. म्हणूनच, मालमत्तेच्या बाबतीत नात्यांपेक्षा कायद्यावर अधिक विश्वास ठेवायला हवा.
कायदेशीर बाबी
- आर्थिक गुंतवणूक असली तरी जर ती कागदावर नोंदवलेली नसेल, तर ती हक्क सिद्ध करत नाही.
- घरात राहण्याची परवानगी म्हणजे तात्पुरती सोय, ती मालकी हक्क ठरत नाही.
- मालमत्तेसंबंधी दावा करताना स्पष्ट कागदपत्र, करार आणि कायदेशीर प्रक्रिया गरजेची असते.
“आपल्या नात्यांमुळे मिळालेला आधार, कायमस्वरूपी हक्क देत नाही.” हा न्यायालयाचा निर्णय अनेकांसाठी डोळे उघडणारा ठरू शकतो. कुटुंबातही मालमत्तेच्या बाबतीत विनाअडथळा व्यवहारासाठी कायद्याचे पालन करणे हीच शहाणपणाची गोष्ट आहे.
शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता 12 फुटांचा होणार; शासनाचा मोठा निर्णय




